नगरपरिषद निधीतून अभ्यागतांच्या सोयीसाठी सिमेंट बेंचेस: उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर
सिंधुदूर्ग/ / राजू तावडे
ज्येष्ठ नागरिक तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्यात विविध कामांसाठी येणाऱ्या अभ्यागतांच्या बैठकीच्या सोयीसाठी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी नगरपरिषद निधीतून सहा सिमेंटचे बेंचेस बसवून दिले आहेत. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सावंतवाडी परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी अनेकदा पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना तासन् तास उभे राहावे लागते आणि मोठा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन ॲड. निरवडेकर यांनी पुढाकार घेतला. सावंतवाडी पोलीस स्टेशन परिसर, श्रमविहार कॉलनी आणि जुस्तीन नगर या भागांत हे सिमेंटचे बेंचेस बसवण्यात आले आहेत.
या बैठक व्यवस्थेमुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना, तसेच कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या या तत्पर आणि जनहितैषी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


