कुडाळात भंगसाळ नदीपात्रात महिला आणि मुलांसह दुचाकी कोसळली
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
कुडाळ शहरातील भंगसाळ नदीवरील गणेश घाटाला लागून असलेल्या बांधावरून दुचाकी थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना आज दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील आई आणि मुलगा नदीपात्रात पडून जखमी झाले. त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
सावंत नामक महिला आपल्या मुलासह टी. व्ही. एस. ज्युपिटर दुचाकीवरून आंबडपाल येथून कुडाळ बाजारपेठेत जाण्यासाठी निघाली होती. गणेश घाटाजवळील बांधावरून जात असताना दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली. बांधावरून सुमारे १५ ते २० फूट अंतरावरून दुचाकी नदीत कोसळल्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही नदीच्या पाण्यात गहाळ झाले.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी काम करत असलेले प्रसाद शेलटे, उमेश शेलटे, अक्षय शेलटे आणि अन्य ग्रामस्थांनी तत्परता दाखवत आई-मुलाला नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढले.


