न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांद्याच्या नैतिक मोरजकरला ‘महाराष्ट्राचा लाडका कवी २०२६’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

     खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा या प्रशालेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या नैतिक नीलेश मोरजकर याने काव्यसादरीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. काव्ययोग काव्यसंस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्राचा लाडका कवी २०२६’ या व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धेत नैतिकने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्याने सादर केलेल्या ‘हासरा नाचरा पाऊस’ या कवितेतून कोकणातील पावसाचे निसर्गरम्य चित्रण केले होते. त्याच्या या यशामुळे बांदा परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कविता लेखन आणि काव्यसादरीकरणाची आवड असलेल्या नैतिकने आपल्या कल्पकतेच्या आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर या स्पर्धेत यश मिळविले. स्पर्धेसाठी त्याने ‘हासरा नाचरा पाऊस’ ही कविता सादर केली. कोकणातील पावसाचे बदलते रूप, निसर्गातील चैतन्य आणि पावसामुळे खुलून येणारे परिसराचे सौंदर्य या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न त्याने केला. कोकणच्या निसर्गाशी घट्ट नाते सांगणाऱ्या पावसाचे चित्र शब्दांतून उभे करत त्याने आपल्या काव्यप्रतिभेची झलक दाखवून दिली.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना स्वतःची मराठी कविता सादर करून तिचा व्हिडिओ संस्थेकडे पाठविण्याची संधी देण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील शेकडो कविनी सहभाग घेतला होता. कवितेचा आशय, विषय, सादरीकरण तसेच सोशल मीडियावरील प्रेक्षकांचा प्रतिसाद या निकषांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली. नैतिकने सादर केलेल्या ‘हासरा नाचरा पाऊस’ या कवितेने परीक्षकांसह रसिकांचेही लक्ष वेधून घेतले. त्याच्या सादरीकरणाची राज्यस्तरावर दखल घेत त्याला द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, आकर्षक सन्मानचिन्ह आणि अक्षरधन देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील सदाशिव पेठ येथील अक्षरवेल सभागृहात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

नैतिकने शालेय शिक्षणासोबतच मराठी साहित्याची आवड जोपासली असून, कविता लेखन आणि सादरीकरणाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या या यशामुळे खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नैतिकच्या या यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार आणि बांदा परिसरातून अभिनंदन होत असून, त्याच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे