सिंधुदुर्ग येथे स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे उद्घाटन; स्वयंचलित वाहन चालक चाचणी मार्गाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न
सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवहन व्यवस्था अधिक आधुनिक, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग अंतर्गत उभारण्यात आलेल्या स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे (Automated Testing Station – ATS) उद्घाटन तसेच मान्यताप्राप्त वाहन चालक चाचणी मार्गाचे (Accredited Driving Test Track – ADTT) भूमिपूजन आज महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नारायण राणे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल आणि जिल्हा परिषद सदस्या सुप्रियाताई वालावलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र (ATS)*
स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची योग्यता तपासणी आधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या केंद्रामध्ये वाहनांच्या तांत्रिक स्थितीचे वस्तुनिष्ठ, मानकीकृत पद्धतीने परीक्षण करण्यात येणार आहे. विशेषतः परिवहन संवर्गातील वाहनांच्या योग्यता तपासणी प्रक्रियेला अधिक कार्यक्षम बनविण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मोटार वाहन कायदा, १९८८ मधील तरतुदींनुसार रस्त्यावर धावताना वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्यता तपासणी महत्त्वाची असते. स्वयंचलित तपासणी प्रक्रियेमुळे वाहनांच्या विविध तांत्रिक बाबींचे निर्धारित निकषांनुसार परीक्षण करणे शक्य होणार असून, तपासणी प्रक्रियेत सुसूत्रता वाढण्यास मदत होणार आहे.
मान्यताप्राप्त वाहन चालक चाचणी मार्ग (ADTT)
याच कार्यक्रमात मान्यताप्राप्त वाहन चालक चाचणी मार्ग (Accredited Driving Test Track – ADTT) उभारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून वाहन चालक परवान्यासाठीच्या चाचणी प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. स्वयंचलित वाहन चालक चाचणी मार्गावर वाहन चालविण्याच्या कौशल्यांचे निर्धारित निकषांनुसार वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे चाचणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होऊन एकसमान निकषांवर आधारित परीक्षणास प्रोत्साहन मिळेल.
सक्षम, प्रशिक्षित व वाहतूक नियमांचे पालन करणारे वाहनचालक घडविणे आणि रस्ते सुरक्षेला बळकटी देणे या दृष्टीने ADTT प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
*आधुनिक परिवहन व्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे उद्घाटन आणि स्वयंचलित वाहन चालक चाचणी मार्गाचे भूमिपूजन हे परिवहन विभागाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या दोन्ही सुविधांमुळे वाहनांची योग्यता तपासणी आणि वाहन चालक चाचणी या प्रक्रियांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढणार आहे.
आधुनिक पायाभूत सुविधा, प्रशासकीय प्रक्रिया आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था यांना प्राधान्य देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवहन सेवा अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हे उपक्रम उपयुक्त ठरणार आहेत.


