तिलारी कालव्याचे पाणी बंद केल्यास आंदोलन: मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. केसरकर
सिंधुदुर्ग / राजू तावडे
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तिलारी उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम करण्याची घाई करू नका. कालवा दुरुस्तीच्या नावाखाली कालव्यातील पाणी बंद केले तर शेतकऱ्यांचे पाण्याअभावी होणारे हाल मनसे सहन करणार नाही. कंत्राटदार , सत्ताधारी व अधिकारी यांची पोटे भरण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नका अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर व तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, श्री. योगेश पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शहर प्रमुख राजू कासकर उपस्थित होते.
निवेदनात त्याने म्हटले आहे, ज्या गावांमधून तिलारी धरणाचे कालवे जात आहेत, त्या कालव्यांमधील पाणी जमिनीत मुरून गावातील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे स्थानिक जनतेला पाणीटंचाई भासत नाही आणि टंचाई भासू नये हाच जलसंपदा विभागाचा मुख्य उद्देश आहे. मात्र, पाणीटंचाईच्या काळातच कालव्याचे दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम सुरु करून पाणी बंद केल्याने विहिरींमधील पाण्याची पातळी खालावण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे काम तात्काळ थांबवून कालव्यात पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाने सध्या बांधकामे व इतर कामे बंद करण्याचे आदेश दिले असून दुष्काळ परिस्थितीत बांधकामावर खर्च करू नये असे धोरण आखले आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाने ठिकठिकाणी वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर झालेली असताना कालवा देखभाल-दुरुस्तीसाठी पाणी बंद करणे अयोग्य आहे.
बांदा शाखा कालव्यातील पाणी बंद केल्यास विलवडे, वाफोली, बांदा, इन्सुली यांसह परिसरातील गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पातळी कमी होऊन स्थानिक जनतेला तीव्र टंचाईचा सामना करावा लागेल.
या पार्श्वभूमीवर, मनसेने इशारा दिला आहे की, स्थानिक जनतेचा विरोध डावलून आणि टंचाईकडे दुर्लक्ष करून कालव्याचे काम सुरु ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे काम आक्रमकपणे बंद पाडेल. असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आले आहे.


