चेक अनादरीत प्रकरणी अपिलात आरोपीची शिक्षा कायम, कॅथोलिक सोसायटीच्या बाजूने निकाल
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांनी दाखल केलेल्या धनादेश अनादराच्या (चेक बाउंस) खटल्यात आरोपी संतोष लुडबे (रा. आजगांव) याला वेंगुर्ला न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात दाखल केलेले अपील अतिरिक्त प्रधान जिल्हा न्यायाधीश क्र. २, यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी फेटाळून लावले आहे. या निर्णयामुळे कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम राहिला आहे. या प्रकरणात संस्थेतर्फे ॲड. अमोल मालवणकर व ॲड. सुरेंद्र तेली यांनी कायदेशीर काम पाहिले.
कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शिरोडा शाखेकडून आरोपी संतोष लुडबे यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या अंशतः परतफेडीसाठी त्यांनी ₹१,३४,५००/- रक्कमेचा धनादेश दिला होता. मात्र, सदर धनादेश बँकेत अनादरीत (बाउंस) झाला. त्यामुळे कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने ‘चलनक्षम दस्तऐवज अधिनियमाच्या’ (Negotiable Instruments Act) कलम १३८ अन्वये वेंगुर्ला न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता.
या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर वेंगुर्ला येथील कनिष्ठ न्यायालयाने आरोपी संतोष लुडबे याला दोषी ठरवून खालीलप्रमाणे दोन महिन्यांचा कारावास. दंड व भरपाई ₹१,३४,५००/- ची रक्कम ३० दिवसांच्या आत अदा करण्याचे आदेश. ही रक्कम मुदतीत न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त साधा कारावास. अशी शिक्षा सुनावली होती.
कनिष्ठ न्यायालयाच्या या शिक्षेविरोधात आरोपीने जिल्हा न्यायालयात दाद मागत अपील दाखल केले होते. अपिलाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी पतसंस्थेच्या वकिलांनी कर्जविषयक अधिकृत नोंदी, कर्जदाराने वेळोवेळी भरलेल्या रक्कमांचा योग्य हिशोब, व्याजासंदर्भातील कायदेशीर तरतुदी व नियम तसेच कर्जखात्यातील प्रत्यक्ष देय रक्कमेचा अचूक हिशोब न्यायालयासमोर मांडला.
फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेऊन मा. अतिरिक्त प्रधान जिल्हा न्यायाधीश क्र. २, श्री. इंदलकर साहेब यांनी आरोपीचे अपील फेटाळून लावले आणि कनिष्ठ न्यायालयाचा शिक्षेचा निर्णय कायम ठेवला.


