न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

साबणनिर्मितीतून विद्यार्थ्यांनी फुलविली उद्योजकतेची स्वप्ने …. १२५ आयुर्वेदिक साबणांची विक्री

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

  केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष कृतीतून कौशल्ये आत्मसात करण्याच्या उद्देशाने श्री जनता विद्यालय, तळवडे येथील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी साबणनिर्मितीचा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पाच प्रकारच्या रंगीबेरंगी आयुर्वेदिक अंघोळीच्या साबणांचे सरस्वती पूजनाच्या दिवशी प्रदर्शन व विक्री केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सुमारे १२५ साबणांची विक्री करत उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्या पाठ्यपुस्तक निर्मिती नियोजनानुसार चालू शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात व्यवसाय मार्गदर्शन या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. या विषयांतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यापूर्वी ‘शालेय परसबाग’ हा पहिला प्रकल्प राबविला होता. त्यानंतर दुसऱ्या प्रकल्पात साबणनिर्मिती करून विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेची आणि कौशल्यांची प्रचिती दिली.

आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांनुसार विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि स्वयंरोजगाराची मानसिकता विकसित व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. साबण तयार करण्यापासून ते त्यांचे प्रदर्शन, विक्री आणि ग्राहकांशी संवाद साधण्यापर्यंतच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना व्यवसायाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.

या उपक्रमासाठी व्यवसाय मार्गदर्शन विषयाचे शिक्षक दयानंद बांगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी साबण तयार करून त्यांना आकर्षक स्वरूप दिले.

या विक्री स्टॉलचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी प्रकल्पासाठी आर्थिक सहकार्य करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना, अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना कृतीशील शिक्षण मिळते, त्यांच्यात व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण होतो आणि भविष्यात स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित होतात, असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळण्याबरोबरच नियोजन, उत्पादन, विक्री, आर्थिक व्यवहार आणि संघभावना यांचा अनुभव घेता आला. ‘शिकता शिकता कमवा आणि कौशल्यातून स्वावलंबी बना’ या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद आडेलकर यांनी केले. या उपक्रमाचे पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी आणि शिक्षक-पालक संघाने कौतुक करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे