सामंत ट्रस्ट तर्फे गरजू रुग्णांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी येथील डॉ. भाऊसाहेब परूळेकर नर्सिंग होम येथे मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे शुक्रवारी जिल्ह्यातील गरजू रुग्णांना व होतकरू विद्यार्थ्यांना डॉ. जयेंद्र परुळेकर आणि पत्रकार सिताराम गावडे यांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
आधीच महागाईचा भडका उडालेला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळाचे सावट आहे.
औषधोपचार करणे अनेक सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे फार कठीण आहे. अशावेळी “फुल ना फुलाची पाकळी” या तत्त्वावर सामंत ट्रस्ट तर्फे वारंवार करण्यात येणारी आर्थिक मदत ही अनेक गरजूंना दिलासा देणारी आहे.
यावेळी मातोंड येथील परशुराम धुरी यांना डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी,ओटवणे येथील रामकृष्ण गावकर यांना रक्तदाब व शस्त्रक्रियेसाठी, तळवडे येथील तानाजी कुंभार यांना बायपास शस्त्रक्रियेसाठी,
ओटवणे येथील राॅकी माडतीस यांना हृदयरोगावरील औषधोपचारांसाठी,बिरोडकर टेंब सावंतवाडी येथील भिकाजी बिरोडकर यांना मधुमेह आणि रक्तदाब औषधोपचारासाठी,वेर्ले येथील द्रौपदी कदम यांना मणक्यांच्या आजारावरील उपचारासाठी अशा प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले.
त्याचवेळी माणगाव येथील दिव्या मेस्त्री, मातोंड येथील सचिन नाईक, गोवा येथील नितीन फडके,मातोंड येथील पूजा राऊत, शिरोडा येथील सुधीर पवार,न्हावेली येथील ज्ञानेश नाईक अशा सहा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये प्रदान करण्यात आले.
यावेळी लाभार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मुंबई येथील कै दिनकर गंगाराम सामंत ट्रस्टचे विश्वस्त जयप्रकाश आडेलकर,सौ रत्नाताई आडेलकर,ॲड सुनील सामंत,तिर्थराज उर्फ बाळासाहेब सामंत व अमितदादा आडेलकर या सर्वांचे आभार मानले.


