न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बेडची कमतरता, ठाकरे शिवसेनेचे रुपेश राऊळ आक्रमक

 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

     वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील विकास बर्डे या युवकाला मारहाण झाल्यानंतर त्याच्या उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे घडलेल्या प्रकारावरून ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी मंगळवारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग एकचे डॉ. विशाल रेड्डी यांना जाब विचारत घेराव घातला. यापुढे अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ देणार नसल्याचे आश्वासन डॉ. विशाल रेड्डी यांनी दिल्यानंतर हा घेराव मागे घेण्यात आला.

यावेळी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख राजू शेटकर, उपतालुकाप्रमुख अशोक धुरी, नगरसेवक देवा टेमकर, विभागप्रमुख विनोद काजरेकर, नामदेव नाईक, सुनील गावडे, उपविभागप्रमुख प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, संदीप गवस जखमी रुग्ण विकास बर्डे, यांची पत्नी, नातेवाईक यांच्यासह तुळस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

या चर्चेदरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याची बाब समोर आली. रुग्णालयातील सुविधांअभावी रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे. स्थानिक आमदार आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी नेमके काय करतात, असा सवाल उपस्थित करत रुग्णालयातील बेडची समस्या तातडीने दूर करण्याची मागणी त्यांनी केली.

तुळस येथील विकास बर्डे या युवकाला शंकर कुंभार नावाच्या व्यक्तीने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. या मारहाणीत विकास यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला मोठी जखम झाली होती व नऊ टाके पडले होते. पाठीवरही मार बसला होता. त्याची परिस्थिती गंभीर होती. त्याच्या डोक्याचा सिटीस्कॅन करून, रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी त्यांना मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज दिल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या रुग्णाला आवश्यक वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्याऐवजी घरी पाठविण्यात आल्याने नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी विकास यांना उलट्या होऊ लागल्याने त्यांना पुन्हा याच रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकारामुळे रुग्णांच्या उपचारांमध्ये हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.

डोक्याला मार लागलेल्या रुग्णाला किमान २४ तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत मध्यरात्री रुग्णाला डिस्चार्ज देणे योग्य नसल्याचे मत रुपेश राऊळ यांनी व्यक्त केले. गरीब आणि सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून असतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या उपचारांबाबत अधिक जबाबदारीने काम करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे शिकाऊ डॉक्टरांकडून सांगण्यात आल्याने शिवसैनिक अधिक आक्रमक झाले. रुग्णालयात बेडची कमतरता असेल तर सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहनही राऊळ यांनी केले. यापुढे रुग्णांना त्रास होईल किंवा त्यांच्या उपचारांमध्ये निष्काळजीपणा होईल, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी रुग्णालयातील रक्ततपासणीसाठी रात्री साडेबारा वाजल्यानंतर नमुने घेतले जात नसल्याची, तसेच सोनोग्राफीसाठीही उशिरापर्यंत सुविधा उपलब्ध होत नसल्याची तक्रार शिवसैनिकांनी डॉ. विशाल रेड्डी यांच्यासमोर मांडली. या समस्यांकडे आपण जातीने लक्ष देऊ आणि यापुढे अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, असे आश्वासन डॉ. रेड्डी यांनी दिले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी घेराव मागे घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे