न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दुग्धव्यवसायासाठी पात्र शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून सर्वोतोपरी मदत… मनीष दळवी

सिंधुदुर्ग / ऋत्वीका पालकरशितप 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात दुधाळ जनावरे खरेदीसाठी पात्र व इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोतोपरी मदत करेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष मा. श्री. मनीष दळवी यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृह येथे आयोजित दूधाळ जनावरे खरेदी योजने संदर्भात आयोजित संस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना केले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी दुग्धव्यवसायासारखा शेतीपूरक व्यवसाय उभा करणे आवश्यक आहे. प्रत्येक दुग्धव्यावसायिकाने गावातील आणखी पाच शेतकऱ्यांना जोडून शेतकऱ्यांचा एक गट तयार करावा. अशा प्रकारे प्रत्येक गावात गट तयार झाल्यास जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल. यासाठी आवश्यक ते आर्थिक पाठबळ सिंधुदुर्ग जिल्हा बँक निश्चितपणे देईल.
शेतकरी लाभार्थी निवडीसाठी शासकीय यंत्रणांची मदत घेता आली असती परंतु निवडलेले लाभार्थी दुग्धव्यवसायाशी प्रत्यक्ष जोडलेले असतीलच याची खात्री नसते. त्यामुळे आपल्या दुग्ध संस्थांशी संबंधित, दुग्धव्यवसायाचा अनुभव तसेच आवड असलेल्या शेतकऱ्यांची निवड करणे गरजेचे आहे. यंदा तीव्र पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता जनावरांची योग्य काळजी घेणारे लाभार्थी निवडणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच योग्य लाभार्थी निवडीसाठी तुमच्या अनुभवाचा आणि सहभागाचा उपयोग होणे गरजेचे आहे. कारण योग्य लाभार्थ्यांची निवड तुम्ही इतर यंत्रणांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता.
जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक चारा बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार असून चारा लागवडीसाठी अतिरिक्त अनुदान देण्याबाबत विचार सुरू आहे. शासनामार्फतही सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांनीही एका दूध उत्पादकाला किमान वीस हजार रुपयांचे अतिरिक्त आर्थिक सहकार्य देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. दूध संकलनात वाढ करणाऱ्या संस्थांना व्यवस्थापन खर्चासाठीही आर्थिक सहाय्य देण्याबाबत जिल्हा बँक सकारात्मक विचार करत असून यासंदर्भातील प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. “बँकेचा उद्देश नफा मिळवणे नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे,” असे सांगत दूध संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात दुग्धव्यवसायाची चळवळ उभी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्याचे आवाहन यावेळी बँकेचे अध्यक्ष मा .श्री. दळवी यांनी केले.
या सभेला बँकेचे संचालक सर्वश्री दिलीप रावराणे, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अनिरुद्ध देसाई तसेच विविध दुग्ध संस्थांचे प्रतिनिधी आणि दुग्ध व्यावसायिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे