न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य संच मिळणार; महाराष्ट्र शासनाची मंजुरी…श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मूलभूत वस्तू संच सहाय्य योजनेला शासनाने महत्त्वपूर्ण मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचा संच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

केंद्र शासनाने कामगारांसाठी नवीन चार कामगार संहिता लागू केल्यानंतर सामाजिक सुरक्षा संहिता २०२० अंतर्गत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक योजना राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने शैक्षणिक सहाय्य योजनेत सुधारणा करून वस्तू स्वरूपात शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.

 

या प्रस्तावानुसार इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना ‘मूलभूत वस्तू संच सहाय्य योजना’ अंतर्गत शैक्षणिक साहित्य संच देण्यास शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.

 

या संचामध्ये मूलभूत संचातील वस्तू

पाण्याची बाटली, थंड/गरम पाण्याचे थर्मास,टिफिन बॉक्स, छत्री,रेनकोट, परीक्षासाठिचे पॅड, लॉग बुक, ड्रॉईंग बुक, बॉल पेन बॉक्स, पेन्सिल बॉक्स,भूमितीचा कंपास, ऑईल पेस्टल्स, पोस्टर कलर, ब्रश संच, प्लॅस्टिक पट्टी,सोलर लॅम्प, कॅल्क्युलेटर, फोल्डिंग अभ्यास टेबल,व्हाईट बोर्ड (२ मार्कर सहित),गजराचे घड्याळ, शाळेची बॅग,किट बॅग आदी एकूण २२ प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. या संचात एकूण ४९ वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थितीत असलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. बांधकाम कामगारांच्या कुटुंबांसाठी हा निर्णय दिलासादायक आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सदर योजनेस महाराष्ट्र शासन यांच्या कडून मंजुरी देण्यात आल्याची माहिती शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख अ.जा. तथा श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. प्राजक्त चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रक द्वारे दिली आहे. कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजनांमध्ये सुधारणा केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार नारायणरावजी राणे साहेब, कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेब, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, कुडाळ मालवण आमदार निलेशजी राणे साहेब यांचे समस्त कामगार यांच्या वतीने आभार व्यक्त करत असून यामुळे जिल्ह्यातील हजारो कामगार याना थेट लाभ मिळणार असून अधिक माहितीसाठी श्रमिक संघटनेच्या सेवा संपर्क कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन प्राजक्त चव्हाण यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे