न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत एमजीएल गॅस कनेक्शनच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक; पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन

 

सिंधुदुर्ग राजू तावडे 

   सावंतवाडी शहरात एमजीएल (MGL) घरगुती गॅस कनेक्शनच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले आहेत. मागील दोन-तीन दिवसांत नागरिकांना मोबाईलवर मेसेज आणि फोन कॉल करून ओटीपी (OTP) मागितल्याचे प्रकार घडले असून, यामुळे शहरातील २ ते ३ जणांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत आज शनिवारी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात लेखी निवेदन सादर केले. सावंतवाडी शहरात सध्या एमजीएल घरगुती गॅस कनेक्शनबाबत कोणतीही अधिकृत सेवा कार्यान्वित करण्यात आलेली नाही, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्यामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, गॅस कनेक्शनच्या नावाखाली येणाऱ्या कोणत्याही अनोळखी फोन कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. बँक तपशील, एटीएम कार्डची माहिती किंवा कोणत्याही व्यक्तीला मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) अजिबात शेअर करू नका.

कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा अनोळखी ॲप्स मोबाईलमध्ये डाउनलोड करू नका. अशी कोणतीही फसवणूक किंवा संशयास्पद कॉल आल्यास स्थानिक कार्यालयात जाऊन खात्री करा.

जर एखादी व्यक्ती अशा फसवणुकीला बळी पडलीच, तर त्यांनी तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना किंवा धमक्यांना न जुमानता सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे