मालिश करण्याच्या बहाण्याने पारपोली येथे लांबवली १० ग्रॅमची सोन्याची चैन
सिंधुदूर्ग / राजू तावडे
पायाला मालिश करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून, नजर चुकवून १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लांबवल्याची घटना सावंतवाडी तालुक्यातील पारपोली, गावठणवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी रमेश केशव परब (वय ६५ वर्षे, रा. पारपोली, गावठणवाडी, सावंतवाडी) व त्यांची पत्नी घरी असताना दोन अज्ञात इसम काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून त्यांच्या घरासमोर आले. त्यातील एकाने फिर्यादीच्या पत्नीस “आम्ही पायाचे मालिश करून देतो,” असे सांगून फिर्यादीच्या पायाला मालिश करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मालिश करताना गळ्यातील सोन्याची चैन काढून बाजूला ठेवायला सांगितली. भामट्यांनी काम संपवून मोटारसायकलवरून निघून जाताना, बाजूला काढून ठेवलेली अंदाजे ३०,००० रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लाभाडीने चोरून नेली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.


