निराधार ७६ वर्षांच्या आजीला ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ने दिला मायेचा आधार
सिंधुदुर्ग राजू तावडे
मुले शिकून मोठी झाली, नोकरीला लागली आणि लग्नानंतर आपापल्या संसारात रमून गेली. पण ज्या आईने जन्म दिला, तिलाच उघड्यावर सोडून मुलांनी स्वतःचा रस्ता धरला. आपल्या पोटच्या गोळ्यांचा शोध घेत गोव्यावरून सावंतवाडीत आलेल्या ७६ वर्षांच्या निराधार आईला अखेर ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’च्या माध्यमातून मायेचा आणि सुरक्षिततेचा आधार मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती कमलावती हुबलेकर (वय ७६, रा. फोंडा-गोवा) या आपल्या मुलांचा शोध घेत शोधत सावंतवाडीत आल्या होत्या. मात्र, मुलांचा काहीही पत्ता न सापडल्याने हताश झालेल्या कमलावती आजी सावंतवाडी बाजारपेठेतील आरोग्य भुवन येथे डोळ्यात अश्रू घेऊन रडत बसल्या होत्या. तेथील स्थानिक नागरिक श्री. पिंगुळकर यांच्या हे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपाली मुद्राळे आणि हेलन निबरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आजींना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून काल कमलावती आजींना ‘सविता आश्रम’ या सेवाभावी संस्थेत सुरक्षितपणे दाखल करण्यात आले.
आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून देऊन सुखाने जगणाऱ्या मुलांची वाढती संख्या ही आजच्या समाजाची शोकांतिका आहे. गेल्या नऊ वर्षांत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी असे अनेक हृदयद्रावक प्रसंग जवळून पाहिले व हाताळले आहेत. जेव्हा जेव्हा एखादा निराधार व्यक्ती रस्त्यावर भटकताना किंवा एकाकी पडलेला दिसतो, तेव्हा ही संस्था त्यांच्यासाठी देवदूत ठरत आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि सतर्क नागरिकांच्या या तत्परतेमुळे एका असहाय्य वृद्ध मातेला वृद्धापकाळात सुरक्षित निवारा मिळाला असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


