संजू परब यांनी केली आपल्या नेत्याची राजकीय कोंडी, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे
सिंधुदुर्ग: राजू तावडे
स्वतः नगर परिषदेच्या बैठकीला हजर न राहता माजी नगराध्यक्ष तसा विद्यमान नगरसेवक संजू परब हे सावंतवाडीच्या नागरिकांत गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा विषय हा २५ वर्षांपूर्वीचा असून त्यावर कारवाई का झाली नाही असे विचारणारे संजू परब हेच २०१९ मध्ये सावंतवाडीचे नगराध्यक्ष होते. त्यावेळी यांनी कारवाई का केली नाही ? नगरपरिषदेत भाजपची सत्ता २०२६ मध्ये आली. यापूर्वी सत्ता कोणाची होती? २५ वर्षा पूर्वीचा जुना हिशोब मागून श्री. परब यांनी आपल्याच सर्वोच्च नेत्याची राजकीय कोंडी केली आहे. म्हणूनच आहे. प्रसार माध्यमांमार्फत प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजू परब यांचा हा खटाटोप आहे, असा आरोप भाजपा प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.
ॲड. भांबुरे म्हणाले, नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांवर संजू परब यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. नागरिकांत गैरसमज पसरविण्याचे काम ते करत आहेत. आपल्यावर विश्वास असल्याने जनतेने आपल्याला निवडून पाठविले आहे. मात्र, मागच्या दोन्ही बैठकांना एकदा सभात्याग करून व कालच्या वेळी कारण न देता श्री. परब गैरहजर राहिले. सभेची नोटीस, टीपण सर्व सदस्यांना आगाऊ दिली जाते. नगरसेवकांना दिलेली टीपणी ही प्रशासनाकडून आलेली असते. त्यामुळे मुख्याधिकारी यांच्या सहीने आलेल्या टीपणीत काटछाट करणे शक्य आहे का ? असा सवाल त्यांनी केला. संजू परब सभागृहात हजर राहिले असते तर त्यांना कामकाजात काय चर्चा झाली व कोणी आक्षेप घेतला हे समजले असते. असे ॲड. भांबूरे म्हणाले.
उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर अभ्यासू आहेत हे संजू परब यांनीच मान्य केले आहे. श्रेयस मुंज यांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यासाठी माहिती मागवली होती. मात्र, सर्वच माहिती प्रशासनाकडून दिली गेली. तक्रार अनुषंगानेच कारवाईची मागणी आम्ही देखील सभागृहात केली. कदाचीत सभागृहातील सर्व माहिती संजू परब यांच्यापर्यंत पोहचत नसेल. संजू परब यांच्या भूमिकेत विरोधाभास दिसतो. सभागृहात एक अन् प्रेस समोर एक अशी त्यांची भुमिका दिसते. त्यांनी आम्हाला आमने सामने येऊन चर्चा करण्याचे आव्हान केले. हे आव्हान आम्ही केव्हाही स्वीकारायला तयार आहोत. पण, लोकांनी आम्हाला आमने-सामने येण्यासाठी निवडले नसून लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आपणाला निवडून दिले आहे. यांचे ही भान ठेवणे आवश्यक आहे. सभागृहात संजू परब यांनी आपली भूमिका मांडावी, तेथे आमने सामने चर्चा करायला आम्ही तयार आहोत, असेही ते म्हणाले. राजकारण हे प्रसिद्धच साधन नसून महायुती असून देखील काही गोष्टींकडे संजू परब दुर्लक्ष करत आहेत. अशी टीका त्यांनी केली. पाणी पुरवठा सभापतींना क्लिनचीट दिली असे नगराध्यक्षांनी कुठेही म्हटले नाही. चौकशी व्हावी अशी आमचीही इच्छा आहे. सभापतींनी तपासात अडथळा नको म्हणून राजीनामा दिलाय. यावर चौकशी होऊन प्रशासकीय कारवाई होईल, तो अधिकारी जिल्हाधिकारी यांचा आहे अशी माहिती ॲड. भांबुरे यांनी दिली.


