शिवराय नसते तर भारताचा इतिहास राहिला नसता : देवेंद्र फडणवीस … किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा
पुणे/ गौरी देसाई
मी शिवरायांना मानाचा मुजरा करतो. शिवरायांनी छत्रपती शिवरायांच्या राज्यात समता होती, सन्मान होता. रयतेचे राज्य स्थापित करण्याचा कानमंत्र जिजाऊंनी दिला. शिवराय नसते तर भारताचा इतिहास, भूगोल राहिला नसता. छत्रपती शिवरायांनी १८ पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरी किल्ल्यावरील भाषणादरम्यान म्हटलं
किल्ले शिवनेरीवर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९६ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संपूर्ण शिवनेरी परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून भगव्या रंगात न्हाऊन निघालेले हे शिवभूमीचे दृश्य पाहण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी गड दुमदुमला असून भक्ती, उत्साह आणि अभिमानाचा संगम झाल्याचे चित्र शिवनेरीवर पाहायला मिळत आहे.
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गावागावांमधून शिवभक्त सायकल रॅलीसह पायी चालत शिवज्योत घेऊन किल्ले शिवनेरीवर पोहोचले आहेत. ‘हर हर महादेव!’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यभरातून शिवज्योती किल्ले शिवनेरीवर दाखल होत आहेत. या सोहळ्यातून ऊर्जा मिळत असल्याची भावना तरुणाई व्यक्त करत आहे.


