डोळस कानून…. तामिळनाडूत दोघांच्या अमानुष हत्या प्रकरणी मदुराई न्यायालयाकडून ९ पोलीसांना दोनदा फाशीची शिक्षा
मदुराई/ वृत्तसंस्था
तमिळनाडूच्या मदुराई सत्र न्यायालयाने सोमवारी सथानकुलम कोठडीतील मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने याला ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ (रेयरेस्ट ऑफ रेअर) असे म्हटले आणि हे अत्यंत क्रूरता आणि सत्तेच्या गैरवापराचे प्रकरण असल्याचे सांगितले.
न्यायालयाने सर्व दोषींना मृतांच्या कुटुंबीयांना 1 कोटी 40 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण 2020 सालचे आहे. सहा वर्षे सुनावणी चालली. या प्रकरणात एकूण 10 आरोपी होते, त्यापैकी एकाचा कोविड दरम्यान मृत्यू झाला.
खरं तर, 19 जून 2020 रोजी पोलिसांनी मोबाईल व्यावसायिक पी. जयराज (59) आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स (31) यांना ताब्यात घेतले होते. त्यांनी लॉकडाऊन दरम्यान दुकान उघडे ठेवले होते, असा आरोप होता. दोघांना सथानकुलम पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
तेथून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले, जिथे काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी आरोप केला की, दोघांनाही पोलिस ठाण्यात रात्रभर मारहाण करण्यात आली. त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा आणि रक्तस्त्रावाच्या खुणा होत्या.
मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, राज्याच्या सीबी-सीआयडीकडून सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला होता. एजन्सीने एका इन्स्पेक्टर, दोन सब-इन्स्पेक्टर आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह 10 आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
चौकशीदरम्यान, एका महिला कॉन्स्टेबलने जबाब दिला की, वडील-मुलाला रात्रभर मारहाण करण्यात आली होती. पोलिस ठाण्यात टेबल आणि लाठ्यांवर रक्ताचे डाग होते. ही साक्ष या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरली.
फर्स्ट ॲडिशनल डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स जज जी. मुथुकुमारन यांनी CBI चा युक्तिवाद मान्य केला की, दोघांनाही कोठडीत पद्धतशीरपणे छळण्यात आले. त्यामुळे त्यांना कमाल शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, तपासात हेही समोर आले की, सथानकुलम पोलिस ठाण्याचे CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्यात आले नव्हते. रेकॉर्डिंग दररोज आपोआप डिलीट होत असे, त्यामुळे महत्त्वाचे पुरावे मिळू शकले नाहीत.
दोषी ठरवण्यात आलेल्या पोलिसांमध्ये इन्स्पेक्टर एस. श्रीधर, सब-इन्स्पेक्टर पी. रघु गणेश आणि के. बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन आणि ए. समदुरई यांचा समावेश आहे. तसेच, कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुरई, एक्स. थॉमस फ्रान्सिस आणि एस. वेलुमुथु यांचाही समावेश आहे. या प्रकरणात 10वा आरोपी स्पेशल सब-इन्स्पेक्टर पॉलदुरई याचा खटल्यादरम्यान कोविडमुळे मृत्यू झाला होता.



