गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस ७ सप्टेंबरला गोव्यात
पणजी/ प्रतिनिधी
गोव्यात ७ सप्टेंबर रोजी पश्चिम विभाग मंडळाची २८ वी बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
गोवा, गुजरात, महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश पश्चिम विभाग मंडळात आहे.
बैठकीच्या तयारीसंदर्भात अमित शहा यांनी यापूर्वीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी पत्रव्यवहार केला असून, मंडळाचे सदस्य व सल्लागारांना बैठकीत सहभागी होण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बैठकीसाठी आवश्यक सर्व तयारी करण्याच्या सूचना गोवा सरकारला देण्यात आल्या आहेत.


