भूलतज्ज्ञाची हत्या; आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी, पत्नीवर संशय
धारवाड /, वृत्तसंस्था
कर्नाटकातील धारवाड येथे भूलतज्ज्ञ डॉ. किरण होन्राव (वय 45) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला, तर त्यांचा आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत सापडला. मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात डॉ. किरण यांच्या पत्नी डॉ. प्रियांका कदूनहळ्ळी यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
डॉ. किरण हे भूलतज्ज्ञ (Anesthesiologist) होते, तर डॉ. प्रियांका या नेत्ररोगतज्ज्ञ (Ophthalmologist) आहेत. हे दाम्पत्य आपल्या मुलासह धारवाडमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते.
पोलिस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. किरण यांच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाईक आणि मित्रांनी वारंवार फोन केला. त्यावेळी डॉ. प्रियांका यांनी डॉ. किरण ड्युटीवर गेल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या उत्तरांबाबत संशय निर्माण झाल्याने नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता डॉ. किरण यांचा मृतदेह आणि त्यांचा जखमी मुलगा आढळून आला.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


