आपल्या मृत्यूस नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची चिठ्ठी स्टेटस वर ठेवून युवकाची आत्महत्या
हैदराबाद / वृत्तसंस्था
एका २५ वर्षीय रंगाऱ्यानं जीव दिल्याची घटना समोर आली. राहत्या घरी टोकाचं पाऊल उचलत त्यानं जीवन प्रवास थांबवला. घरात पंख्याला लटकलेल्या स्थितीत त्याचं शव सापडलं. जनगणनेच्या अर्जावर अखेरची चिठ्ठी लिहून पेंटरनं आयुष्य संपवलं. त्यानं स्वत:च्या मृत्यूसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरलं आहे. ही घटना तेलंगणाच्या राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यात घडली.
जीव देण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो तरुणानं त्याच्या व्हॉट्स ऍप स्टेटसला ठेवला. पी. वामशी असं जीव देणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्याचे वडील मजुरी करुन पोट भरतात. वामशीनं बारावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. रंगकाम करून तो उदरनिर्वाह चालवायचा. वामशीचे वडील बालैया यांनी गुरुवारी सकाळी त्याचं शव पंख्याला लटकलेल्या स्थितीत पाहिलं.
बुधवारी संध्याकाळी वामशीचा त्याची आई भारती सोबत वाद झाला होता, अशी माहिती वडिलांनी दिली. ‘भांडणानंतर संध्याकाळी ६ वाजता वामशी घरातून निघाला. त्यानंतर रात्री १० वाजता तो घरी परतला. जेवल्यावर तो त्याच्या खोलीत झोपायला गेला. गुरुवारी सकाळी ६ वाजता वामशीच्या खोलीतून टीव्हीचा आवाज ऐकू आला. मी तिथे जाऊन पाहिलं, तेव्हा वामशीचं शव लटकलेलं दिसलं,’ असं वडिलांनी सांगितलं.
ग्रामस्थांनी येल्ला रेड्डीपेट पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना वामशीच्या खोलीत जनगणनेचा एक अर्ज सापडला. तो अर्ज भरलेला नव्हता. पण त्यावर वामशीची स्वाक्षरी होती. त्या अर्जावर तेलुभु भाषेतील मजकूर होता. ‘आदरणीय पोलीस, माझी अडचण, माझा त्रास तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे. माझ्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका,’ असा उल्लेख जनगणना अर्जावर वामशीनं लिहिलेल्या चिठ्ठीत आहे. जीव देण्याआधी लिहिलेली चिठ्ठी वामशीनं व्हॉट्स ऍप स्टेटसवर ठेवली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. डीसीपी नागेंद्र चारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वामशीनं त्याचा फोन खोलीतील कपाटात टाकून दिला होता. गुरुवारी सकाळी झडती घेत असताना आमच्या पथकाला त्याचा मोबाईल सापडला. वामशीला दारुचं व्यसन होतं. आई सोबत त्याचा याच विषयावरुन वाद झाला. यानंतर त्यानं एका मित्रासोबत मद्यपान केलं होतं. कौटुंबिक वादातून त्यानं जीव दिल्याची शक्यता आहे. पण त्यानं जनगणनेच्या अर्जावर अखेरची चिठ्ठी का लिहिली, या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.


