न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार!

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीसह जिल्हा महिला रुग्णालय कुडाळ, उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला, ग्रामीण रुग्णालय पेंडुरकट्टा व दोडामार्ग येथे महाडायलेसीस योजनेंतर्गत किडनीच्या आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सुरू असलेली मोफत डायलेसिस सेवा कायम सुरू राहणार आहे. या सेवेसाठी आवश्यक औषधे व इतर साहित्य पुरवठा मुबलक उपलब्ध करुन द्या. तसेच सेवा पुरविणाऱ्या कंपनीची थकीत बिले तात्काळ अदा करा. सेवे अभावी रुग्णांची गैरसोय नको. अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी महाडायलेसिस योजनेच्या जिल्हा समन्वयक यांना संपर्क साधत ही सेवा विनाखंड सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाडायलेसिस योजनेंतर्गत मोफत डायलेसिस सेवा पुरविण्यात येत आहे. ही सेवा पुरविणाऱ्या मे. एचएलएल लाईफ केअर लि. या कंपनीने सेवा पुरविल्याची बिले न मिळाल्याने ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्याचा इशारा रुग्णालय प्रशासनाला व रुग्णांना लेखी नोटिशीद्वारे दिला होता. त्यामुळे जिल्ह्यातील डायलेसिस रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांनी कंपनीच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून डायलेसिस सेवा विनाखंड सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हा समन्वयकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांच्या डायलेसिस युनिटला पुरविण्यात येणारी आवश्यक औषधे व इतर साहित्याचा साठा पुढील दोन आठवड्यांपुरता उपलब्ध आहे. त्यामुळे या कालावधीत डायलेसिस सेवा सुरू राहणार आहे.

दरम्यान, डायलेसिस सेवा पुरविणाऱ्या संबंधित कंपनीला शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रतिपूर्तीच्या रकमेतून केवळ २५ टक्के रक्कम कॉर्पस फंडासाठी वजा करून उर्वरित पूर्ण रक्कम अदा करण्याबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून रुग्णालय प्रमुखांना कार्यालयीन पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच संबंधित कंपनीची थकीत देयके तातडीने अदा करण्याबाबत शासनस्तरावर योग्य तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाडायलेसीस योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णालयांमधील मोफत डायलेसिस सेवा विनाखंड सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे