तिलारी कालव्याचे पाणी बंद केल्यास कालवा दुरुस्तीचे काम मनसे स्टाईलने बंद: मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर
सिंधुदुर्ग / राजू तावडे
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांचे नूतनीकरण व दुरुस्तीचे काम हाती घेवून शेतकरी बागायतदार यांना आणखी संकटात टाकू नका. असे निवेदन मनसेतर्फे जिल्हाधिकारी व तिलारी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांना देण्यात आले आहे. तरीही मनमानी करून व ठेकेदारांना खुश करण्यासाठी कालव्याच्या कामाला सुरुवात करून कालव्यातील पाणी बंद केल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी कालवा दुरुस्तीचे काम मनसे स्टाईलने बंद पाडण्यात येईल, इशारा मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.
यावर्षी संपूर्ण राज्यात त्याचप्रमाणे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या प्रमाणात मोठी घट झालेली आहे. सरासरी पेक्षा कितीतरी पटीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात पाऊस कमी पडला आहे. याचा परिणाम शेती बागायती वर झालेला आहे. सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात आतापासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना देखील तिलारी पाठबंधारे विभागामार्फत तिलारी प्रकल्पाच्या कालव्याच्या नुतनीकरण व देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करण्यासाठी प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्याचे बंद करण्यात येणार असल्याची नोटीस देखील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वस्तुस्थिती पाहता ज्या गावांमधून तिलारी धरणाचे कालवे जातात त्या कालव्यांमधील पाणी जमिनीमध्ये मुरून या गावातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होते व जनतेला पाणी टंचाई जाणवत नाही. पाणीटंचाई निर्माण होवू नये हाच या कालव्यांमागील जलसंपदा विभागाचा मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे शासनाने सध्या नवीन बांधकामे व इतर कामे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळी परिस्थिती मध्ये बांधकामावर खर्च करू नये असे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील पाणी टंचाई निर्माण होवू नये यासाठी अनेक प्रयत्न केले असून गावोगावी शासनामार्फत लोकसहभागातून जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. असे असताना व जिल्ह्यात शासनामार्फत दुष्काळ जाहीर करण्यात आला असताना कालवा दुरुस्तीचे काम करणे कालव्यात धरणाचे येणारे पाणी बंद करणे योग्य नाही. काही ठिकाणचे पाणी बंद करण्यात आल्याने तेथील बागायती व कालव्यावर अवलंबून असणारी शेती सुकत चालली आहे तसेच विहिरींची पाणी पातळी देखील खाली जात आहे.
या सर्व प्रकाराकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता तिलारी पाठबंधारे विभाग यांचे लक्ष वेधले असून तिलारी कालवा दुरुस्तीचे काम तातडीने बंद करण्यात यावे व कालव्यातून पूर्ववत पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, सावंतवाडी शहर अध्यक्ष राजू कासकर आंबोली विभाग अध्यक्ष काशिराम गावडे उपस्थित होते. दरम्यान मनसेने दिलेल्या निवेदनाची दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली असून याबाबत तातडीने खुलासा करण्यात यावा असा आदेश कार्यकारी अभियंता, तिलारी पाबंधारे विभाग यांना देण्यात आला आहे.


