कलंबिस्त दूध संस्थेतर्फे बोनस व भेटवस्तूंचे वाटप
सिंधुदुर्ग राजू तावडे
कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी मर्यादित संस्थेतर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी सणानिमित्त बोनस व खास भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. संस्थेचे चेअरमन अॅड. संतोष सावंत, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत आणि संचालक प्रकाश तावडे यांच्या शुभहस्ते भेटवस्तूंचे वाटप पार पडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐन दिवाळीत मिळालेल्या या बोनस आणि भेटवस्तूंमुळे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी दूध शेतकरी दशरथ पास्ते, सिद्धेश सावंत, वैष्णव सावंत, राजन घाडी आणि श्री. म्हाडगूत यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भेटवस्तू वाटपानंतर संस्थेची मासिक बैठक पार पडली. या बैठकीत दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध महत्त्वकांक्षी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना दूध वाढीसाठी प्रोत्साहित करणे आणि नवीन गाई-म्हशींचे वाटप करणे. जिल्हा बँक आणि सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठबळ देणे. पशुपालकांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणे असे उपक्रम राबविण्याचे ठरले. नवीन दूध शेतकरी आणि स्थानिक तरुणांना पशुसंवर्धन विकासाच्या दृष्टीने आकर्षित करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी चारा जतन व संवर्धन तसेच पाणी नियोजनाबाबत व्यापक चळवळ उभारण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला. नदी, नाले व ओहोळांवर बंधारे उभारून पाणी साठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत संस्थेने दोन बंधारे यशस्वीरीत्या घातले आहेत. येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत ठिकठिकाणी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.


