ॲड.सिद्धार्थ भांबूरे यांची पत्रकार परिषद म्हणजे अशिक्षित पणाचा कहर; शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर
सिंधुदुर्ग राजू तावडे
भाजपा प्रवक्ते व नगरसेवक ॲड.सिद्धार्थ भांबूरे यांनी संजू परब यांच्या विषयी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे अशिक्षित पणाचा कहर आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये, असा सल्ला शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर यांनी श्री. भांबूरे यांना दिला आहे.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात श्री. परीक्षित मांजरेकर यांनी म्हटले आहे की, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्या वीस दुकान गाळ्यांच्या भिंतींबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती. संबंधित वीस दुकान गाळ्यांच्या भिंती काढण्यात आलेल्या आहेत. संजू परब यांनी त्यावर बोलताना, “तुमच्यात दम असेल तर भिंती घालून दाखवा,” असे आव्हान दिले. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ असा होतो की, त्यांनाच संबंधित गाळ्यांच्या भिंती पुन्हा बांधण्याची इच्छा नाही.
संबंधित इमारतीचे २५ वर्षांपूर्वीच ऑडिट झाले असून, इमारतीला कोणताही धोका नसल्याची माहिती संजू परब यांना होती. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेत वस्तुस्थिती मांडली होती. मात्र, नगरपरिषद मासिक बैठकीमध्ये वीस दुकान गाळ्यांच्या भिंतींचा विषय नेमका कशासाठी उपस्थित करण्यात आला? दुकान गाळ्यांच्या भिंती पुन्हा बांधण्याचा विषय संजू परब यांच्या मनात कधीच नव्हता. त्यामुळे या विषयावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये.
अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करण्यापेक्षा आधी संपूर्ण वस्तुस्थिती समजून घ्या आणि मगच बोला. अशा प्रकारची वक्तव्ये आपल्यासारख्या जबाबदार व्यक्तीला शोभत नाहीत असे शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


