ठरलं… विठुरायाच्या दर्शनासाठी माऊलींची वारी कधी निघणार?… वाचा
पुणे/ गौरी देसाई
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. यंदा ८ जुलै रोजी दुपारी तीन वाजता माउलींची पालखी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आळंदीहून प्रस्थान करणार आहे. तर २४ जुलै रोजी हे वैष्णवांचे रिंगण पंढरपूर नगरीत दाखल होईल. दरम्यान यंदाच्या १७ दिवसांच्या या पायी वारीत भक्तिभावाचा परमोच्च बिंदू ठरणारी ४ गोल आणि ३ उभी रिंगणे होणार आहेत. मुख्य आषाढी एकादशीचा सोहळा २५ जुलै रोजी साजरा होणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली आहे.”
पालखी सोहळ्याचा मार्गक्रम पाहता, ८ जुलैला प्रस्थान झाल्यावर ९ आणि १० जुलैला पुणे शहरात मुक्काम असेल. त्यानंतर ११ व १२ जुलैला पालखी सासवडमध्ये विसावेल. १३ जुलैला जेजुरी आणि १४ जुलैला वाल्हे येथे मुक्काम करून १५ जुलैला नीरा स्नानानंतर पालखी लोणंदकडे मार्गस्थ होईल. १६ जुलै रोजी चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पार पडेल आणि तरडगाव येथे मुक्काम होईल. वारीचा पुढचा प्रवास १७ जुलैला फलटण, १८ जुलैला बरड आणि १९ जुलैला नातेपुते असा असेल. २० जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण झाल्यानंतर माळशिरसमध्ये मुक्काम होईल.”
२१ जुलैला खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण आणि वेळापूर येथे मुक्काम, तर २२ जुलैला ठाकुरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे ऐतिहासिक ‘बंधू भेट’ होऊन वारी भंडीशेगावला पोहोचेल. २३ जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल व उभे रिंगण अशा दोन्ही सोहळ्यांचा आनंद घेत पालखी वाखरी येथे विसावेल. २४ जुलैला आषाढ दशमीच्या मुहूर्तावर सर्व संतांच्या पालख्यांसह माउलींची पालखी पंढरपुरात प्रवेश करेल.”




