लाता मंगेशकर यांना आव्हान असलेल्या गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन
मुंबई / संदीप मुळीक
संगीत क्षेत्रातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. आज (31 मे 2026) रोजी मुंबईतील राहत्या घरी सुमनताईंनी अखेरचा श्वास घेतला. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. यात मराठी, हिंदी, गुजराती आणि बंगाली भाषेतील गाण्याचा समावेश आहे. त्यांची अनेक गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारताच्या (आताचा बांग्लादेश) भवानीपूर येथे झाला होता. त्यांचे माहेरचे नाव सुमन हेमाडी असे होते. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या. सुमन कल्याणपूर यांनी शास्त्रीय संगीताचा अगदी कसून अभ्यास केला वडिल शंकरराव हेमाडी आणि आई सिताबाई यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीताचे सुरवातीचे धडे गिरवले. त्यांनी लग्नापूर्वीही अनेक गाणी गायली.
सुमन कल्याणपूर यांची लोकप्रिय मराठी गाणी म्हणजे ‘रिमझिम झरते श्रावण धारा’, ‘शब्द शब्द जपून ठेव’, ‘केशवा माधवा’, ‘ओमकार प्रधान रूप गणेशाचे’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘या लाडक्या मुलानो’, ‘आई सारखे दैवत सार्या जगतात नाही’,’केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर’, ‘वाट इथे स्वप्नातील संपली जणु’, ‘अरे संसार संसार’, ‘असावे घर ते आपुले छान’, ‘आकाश पांघरून जग शांत झोपलेले’,’नाविका रे वार वाहे रे’, ‘या कळ्यांनो या फुलांनो’ (मंत्र वंदे मातरम), ‘कशी करू स्वागता’, ‘तुझ्या कांतीसम’. तसेच त्यांनी मोहम्मद रफी, मन्ना डे, तलत महमूद, हेमंतकुमार अशी विविध गायकांसोबतही अनेक गाणी गायली.
एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद हे सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित होऊन त्यांनी HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी मोहमद शफी यांनी संगीत दिलेल्या “मंगु” या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले होते. गाण्याचे बोल होते “कोई पुकारे धीरे से तुझे”. त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड चालुच राहिली आणि लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या गाण्याचा तारकामंडळात त्यांनी मानाचे स्थान मिळवले. सुमन कल्याणपुर यांच्या आवाजाने एका पिढीला अक्षरशः वेड लावले होते. “जिथे सागरा धरणी मिळते” असे म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, “घाल घाल पिंगा वार्यार माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात” असे म्हणणारी सासुरवाशीण, “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाहि” हि अंगाई, “कशी गवळण राधा बावरली” हि गवळण, “सांज आली दुरातुनी, क्षितीजाच्या गंधातुनी” हे विरहगीत, “नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे”, “केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर” हे भावगीत, “केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा”, “जगी ज्यास कोणी नाहि त्यास देव आहे”, “देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझिया गळा” सारखी भक्तीगीते, “उठा उठा चिऊताई”, “या लाडक्या मुलांनो या” सारखी बालगीत अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता. किंबहुना आजही तितकीच गोड वाटतात. पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असायचा.


