गोव्याचे प्रसिद्ध मराठी,कोंकणी नाट्यकर्मी,गायक व कलाकार पद्मश्री प्रसाद सावकार यांचं निधन.. उद्या अंत्यसंस्कार
पणजी/ वृत्तसंस्था
गोव्याचे प्रसिद्ध नाट्यकर्मी,गायक व कलाकार पद्मश्री प्रसाद सावकार यांचे बुधवार दि. १७ जून रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थीवावर आज दि. १८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता पणजी इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने मराठी संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचा एक सुवर्णपट कायमचा पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत असून कला, साहित्य आणि नाट्यक्षेत्रामध्ये त्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.
प्रसाद सावकार यांचे पूर्ण नाव सांबप्रसाद रघुवीर सावकार असे होते. गोमंतकीय संगीत रंगभूमीला मोठी परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध सावकार घराण्यात त्यांचा जन्म गुजरात मधील बडोदा येथे झाला. त्यांचे वडील रघुवीर सावकार हे तत्कालीन मराठी रंगभूमीवरील अत्यंत नामवंत आणि दिग्गज गायक-नट होतेत्यामुळे प्रसाद सावकार यांना बालपणापासूनच घरातूनच संगीत आणि नाटकाचे उत्तम संस्कार मिळाले आणि वडिलांच्याच छायेखाली त्यांनी गायन व अभिनयाचे प्राथमिक धडे गिरवले. बालकलाकार म्हणून ‘जिंजीहून सुटका’ या नाटकातून प्रसाद सावकार यांनी पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी ‘संशयकल्लोळ’ या अत्यंत लोकप्रिय संगीत नाटकात एकाच वेळी तब्बल चार वेगवेगळ्या भूमिका साकारत रंगभूमीवर एक अनोखा विक्रम नोंदवला होता.
विशेषतः १९६० ते १९७२ या काळात मराठी संगीत रंगभूमीला पुनरुज्जीवित करण्यात आणि ती रसिकांपर्यंत पुन्हा तितक्याच ताकदीने पोहोचवण्यात प्रसाद सावकार यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. त्यांनी ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘सुवर्णतुला’, ‘मंदारमाला’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘तो राजहंस एक’ आणि अजरामर ठरलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये अत्यंत संस्मरणीय भूमिका साकारल्या.
शास्त्रीय संगीतावरील कमालीचे प्रभुत्व, भरदार व पहाडी आवाज आणि प्रभावी अभिनय यामुळे त्यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांनी गायलेली ‘जय गंगे भागिरथी’, ‘सावन घन गरजे’, ‘रतिहून सुंदर’, ‘भरे मनात सुंदरा’ आणि ‘नारायणा रमारमणा’ यांसारखी नाट्यपदे आजही रसिक श्रोत्यांच्या मनात घर करून आहेत.
नाट्य आणि संगीत क्षेत्रातील त्यांच्या या उत्तुंग कामगिरीची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या मानाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय त्यांना बालगंधर्व सुवर्णपदक, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, आणि गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार यांसारख्या अनेक प्रतिष्ठित आणि सर्वोच्च पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
प्रसाद सावकार यांच्या जाण्याने संगीत विश्वातील एक उमदा आणि अजरामर स्वर जरी कायमचा शांत झाला असला, तरी त्यांनी अजरामर केलेली नाट्यपदे, संस्मरणीय भूमिका आणि त्यांचा कलाविष्कार रसिकांच्या स्मरणात सदैव जिवंत राहील.


