गोव्यातील प्रतिष्ठित बिट्स पिलानीत आज सहावी आत्महत्या… चौकशीची अमित पाटकरांची मागणी
पणजी/
गोव्यातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था ‘बिट्स पिलानी’ च्या कॅम्पसमध्ये आज सकाळी बेंगळुरूमधील एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी राज्य सरकार आणि संस्था प्रशासनावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे.
आज पर्यंत ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू
अमित पाटकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि बिट्स पिलानी व्यवस्थापनाला जाब विचारला आहे. त्यांच्या मते, अवघ्या वर्षभरात ही सहावी घटना आहे. “प्रत्येक मृत्यू ही टाळता येण्यासारखी शोकांतिका होती, पण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तरुण जीव जात आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थी सुरक्षा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न
पाटकरांनी पोस्टमध्ये काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा का नाही? नामांकित संस्था असूनही विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी दिले जाणारे समर्थन अपुरे आणि कुचकामी का आहे? असे सवाल त्यांनी विचारले आहेत.
आम्हाला आता केवळ आश्वासनं नकोत, तर या सर्व प्रकरणांची निष्पक्ष आणि स्वतंत्र ‘न्यायालयीन चौकशी’ हवी आहे,” अशी मागणी पाटकरांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे हे सत्र थांबवण्यासाठी आणि या मृत्यूंना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी अनिवार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


