कराचीत निवासी इमारतीत स्फोट… आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू
कराची/
कराची शहरात (19 फेब्रुवारी) पहाटे एका निवासी इमारतीत झालेल्या भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट संशयास्पद गॅस गळतीमुळे झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे, आज पाकिस्तानात रमझान महिन्याचा पहिला दिवस असल्याने पहाटे ‘सहरी’साठी लोक जागे असतानाच ही दुर्घटना घडली, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कराचीच्या ‘ओल्ड सोल्जर बाजार’ परिसरातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पहाटे 4:30 च्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की इमारतीचा एक मोठा भाग पत्त्यासारखा कोसळला. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, रुग्णालयात उपचार सुरु असताना इतर दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 14 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे; 2 ते 17 वयोगटातील 9 मुलांचा या स्फोटात दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमींमध्येही 7 मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाचे जवान अजूनही ढिगाऱ्याखाली शोधमोहीम राबवत आहेत.”


