गोव्याकडे येणारी खाजगी बस अंकोल्याजवळ पलटी… एक ठार २० गंभीर
कारवार / प्रतिनिधी
उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यात कंचिनबागीलूजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खासगी बस उलटून झालेल्या दुर्घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळ्ळारीहून गोव्याकडे येणारी ‘सीबर्ड’ कंपनीची खासगी बस (जिए ०८ व्ही ८७१९) ्अंकोला-यल्लापूर मार्गावरून प्रवास करत होती. कंचिनबागीलू परिसरात आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस महामार्गाच्या मधोमध उलटली.
बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते. यापैकी आंध्र प्रदेशमधील शरणय्या (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच २० हून अधिक प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांना तातडीने अंकोला तालुका रुग्णालय तसेच कारवार येथील जिल्हा रुग्णालय (क्रिम्स) येथे उपचारासाठी दाखल केले आहे.


