जगन्नाथपुरी रथ यात्रेला प्रचंड गर्दी… गुदमरून एकाचा मृत्यू १२०हून अस्वस्थ
जगन्नाथपुरी/ वृत्तसंस्था
ओडिशाच्या पुरीमध्ये आयोजित जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेत गुरुवारी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती ओढवल्यानं मोठी दुर्घटना घडली. भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी झालेल्या अलोट गर्दीमुळं बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यात गुदमरून एका भाविकाचा मृत्यू झाला. तर १२० हून अधिक भाविकांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुरीच्या जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयासह इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेनंतर तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केले असून, परिस्थिती नियंत्रणात आणली.
मंदिर परिसर आणि ग्रँड रोडवर गुरुवारी सकाळी लाखो भाविकांची गर्दी उसळली. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची पारंपरिक ‘पहाडी’ सोहळ्यावेळी भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी झाली. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक भाविकांचा श्वास कोंडला. अनेक जण बेशुद्ध पडले.”


